आता तर फक्त बॉक्स उघडलाय ! खडसे आलेत, भाजपचे अनेक आमदार संपर्कात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, भाजपने खडसेंची काळजी करु नये. खडसेंना काय मिळणार हे त्यांना आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना माहिती आहे. खडसेंनी चाळीस वर्षे भाजपची सेवा केली. मात्र, मागील चार पाच वर्षांमध्ये भाजपने त्यांचा अपमान केला. आमच्याकडून तसे काही घडणार नाही. शरद पवार योग्य वेळी त्यांना न्याय देतील, असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले, “आजवर भाजपात अनेक नेत्यांनी प्रवेश केला. भाजप त्यांच्या आमदारांना लवकरच सरकार येणार असल्याचे चॉकलेट दाखवत होते. पण एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादीत आले. त्यामुळे या चर्चा बंद होतील. आता कुठे बॉक्स उघडलाय, भाजपचे अनेक आमदार आणि नेते संपर्कात असून लवकरच ते भाजपची साथ सोडतील,” असा दावा भुजबळ यांनी बोलताना केला.

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. सरकारने ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असते तरी त्यावर विरोधी पक्षाने टीका केली असती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचवायची आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारने येणे असलेली रक्कम मिळाली तर शेतकऱ्यांना अजून मदत करणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केलं.

You might also like