सोन साखळी चोरट्यांना नागरिकांनीच पकडले

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पादचारी नागरिकाच्या गळ्यातील सोन साखळी ओढणार्‍या एका चोरट्याला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले आहे. पण, त्याचा एक साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. सोन साखळी चोरट्यांनी शहरात हैदोस घातला असताना त्याला पकडण्यात अखेर नागरिकांनाच यश आले आहे.

हर्षद सलीम शेख (वय 20, रा. हरपळे वस्ती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, त्याचा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी अनिकेत धस (वय 38) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दोन दिवसांपुर्वी कसबा फायर स्टेशनसमोरून रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी समोरून दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या गळ्यात सोन साखळी नव्हती. चोरट्यांनी पुन्हा त्यांच्या खिशातील ऐवजावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादींनी त्यांना तीव्र विरोध केला. यामुळे दुचाकीस्वार चोरटे खाली कोसळले. यावेळी त्यांनी हर्षद याला पकडून ठेवले आणि नागरिकांना बोलावले. यादरम्यान, मात्र, हर्षद याचा मित्र तेथून पसार होण्यात यशस्वी झाला. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.