छत्रपती साखर कारखान्याचे चेअरमन प्रदिप निंबाळकर यांचा संशयास्पद मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांनी आज दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिस्तूल साफ करत असताना चुकून गोळी उडाल्याचा दावा परिवाराकडून करण्यात येत आहे.

प्रदीप निंबाळकर यांची ३१ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रातील कारखानदारीत अग्रेसर समजल्या जाणाऱ्या छत्रपती साखर कारखान्याच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली होती. कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कामगारांचा संप सुरू होता. सर्व कामगारांची बैठक घेऊन निंबाळकर यांनी हा संप आजच मिटविला. परंतु संचालकांचे कार्यकारी संचालकांशी कामगारांना बोनस देण्याच्या मुद्‌द्‌यावरून मतभेद झाले. यामुळे निंबाळकर तणावात आले.

दुपारी अडीचच्या सुमारास निंबाळकर हे स्वतःच्या घरात वरच्या मजल्यावर होते. अचानक गोळी झाडल्याचा आवाज आल्याने घरातील सर्वजण वरच्या दिशेने पळाले. त्यावेळी निंबाळकर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारा आधीच त्यांचा मृत्यू झाला.

विशेष म्हणजे चेअरमन पदी निवड झाल्यानंतर पाचच दिवसात त्यांचा आत्महत्येमुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रासह इंदापूर व बारामतीकरांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मागे पत्नी, वडील, एक मुलगा, एक मुलगी व एक भाऊ असा परिवार आहे.