तंटामुक्त अध्यक्षाची आत्महत्या ; पायाने बंदुकीचा चाप ओढून स्वतःला संपवले 

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुकयातील सवते येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनीच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळते आहे.

केशव ज्ञानदेव वारंग (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. यांनी राहत्या घरी बारा बोअर बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (३१ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास ही घडली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केशव वारंग हे पत्नी, मुलासह राहत होते. त्यांचे किराणा माल दुकान आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास ते  दुसर्‍या मजल्यावर गेले. यावेळी घरासमोरील चौकात थर्टी फर्स्टचा जल्‍लोष सुरू होता. यावेळी वारंग यांनी बारा बोअर बंदुकीतून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. जेवणासाठी मुलगा भरतने रात्री नऊ वाजता वडिलांना हाक मारली परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्याने  त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले. यावेळी वडील बेडवरच रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले.

भरतने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नातेवाईकांना धक्‍का बसला. शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे सहकार्‍यांसह तातडीने दाखल झाले. घटनास्थळावरील बंदूक ताब्यात घेतली.  पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात हलविला. केशव वारंग घरगुती कारणातून अनेक दिवसांपासून निराश होते, असा जबाब नातेवाईकांनी दिला आहे.  शाहूवाडी उपविभागाचे प्रभारी पोलिस अधीक्षक अनिल कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पायाने ओढला चाप…

केशव वारंग यांना शिकारीचा नाद होता. त्यातून त्यांना बंदूक चालविण्याचे कसब अवगत होते. गोळी झाडून घेऊन आत्महत्या करताना बेडवर बसून त्यांनी बंदुकीचा दस्ता पायात तर नळ्या हाताने स्वत:च्या छाताडावर धरून पायाच्या अंगठ्याने चाप ओढला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.