Chakan News : खंडणी मागणारा सराईत गजाआड; 1 पिस्टल, 3 कोयते, तलवार जप्त

चाकण/महाळुंगे/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कंपनीतील जागा सपाटी करणाचे काम सोडून देण्यासाठी धमकावत दरमहा 50 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला भाम नदिवरील पुलाजवळ सापळा रचून अटक केली. संतोष मधुकर मांजरे (वय-29 रा. कोरेगाव खुर्द, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष मांजरे याने कंपनीतील कॉन्ट्रॅक मिळवण्यासाठी सुरु असलेले काम थांबवण्याची धमकी दिली. तसेच काम सुरु ठेवण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान, संतोष मांजरे हा कुरकुंडी गावाकडून कोरेगाव खुर्द येथे एका पांढऱ्या रंगाच्या स्विप्ट कारमधून येत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भाम नदीच्या पुलाजवळ सापळा रचला. महाळुंगे पोलीस आपल्या मागावर असल्याची माहिती आरोपीला मिळाली. आरोपीने कार रस्त्यावरच सोडून नजीकच्या ऊसाच्या शेतात पळून गेला. पोलिसांनी अधिकचा बंदोबस्त मागवून शेताला चारी बाजूने घेरून आरोपीला शरण येण्यास सांगितले. मात्र, आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जात असताना पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्टल आणि मॅगझिन त्यामध्ये 6 जिवंत राऊंड जप्त करण्यात आले. गाडीची तपासणी केली असता तीन कोयते आणि एक तलवार आढळून आली. पोलिसांनी कारसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने 2013 मध्ये दोघांचा कोयत्याने सपासप वार करुन खून केला होता. या गुन्ह्यात 2013 पासून 2019 पर्यंत येरवडा कारागृहात कैद होता. आरोपीवर 2 खूनाचे, 2 बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी मागणे असे गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडे सापडलेली पिस्टल कोठुन आणली याचा तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश बिरादार, पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस हवालदार चंदु गवारी, राजु कोणकेरी, अमोल बोराटे, पवन वाजे, विठ्ठल वडेकर, शिवाजी लोखंडे, संतोष काळे, हिरामन सांगडे, शरद खैरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी व राजाराम मोरे करीत आहेत.