चाकण – शिक्रापूर रस्त्यावर 33 लाखाचा ऐवज लुटला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेलपिंपळगाव तालुका खेड येथे हायर कंपनीचे 33 लाख रुपये किंमतीचे महागडे 87 वॉशिंगमशीन, एलईडी टीव्ही घेऊन निघालेला कंटेनर चौघांनी लुटला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 26) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी कंटेनर चालक रामलिंग पंडित पाटील (47, रा. निलंगा, जिल्हा लातूर) यांनी चाकण पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार 4 अनोळखी इसमावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक हा त्याच्या ताब्यातील कंटेनर एम एच 04 जीएफ 9291 मध्ये रांजणगाव येथून हायर कंपनीचे वॉशिंग मशीन व एलईडी टीव्ही घेऊन रांजणगाव एमआयडीसी ते भिवंडी मुंबई असे घेऊन निघाला होता. कंटेनर शेल पिंपळगाव गावच्या हद्दीत भाम नदीच्या पुलाच्या जवळ आला असता चार अनोळखी इसम पिकअप (क्रमांक निष्पन्न नाही ) मधून आले.

त्यातील एक जण कंटेनरमध्ये चालकाच्या बाजूकडून आतमध्ये शिरला व क्लीनर बाजूने दोन जण कंटेनरमध्ये आले. त्यांनी कंटेनर चालकास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करत सीट खाली कोंबून अंगावर बसले व पांढऱ्या दोरीने त्याच्या हात-पाय बांधून व डोळ्यावर पट्टी बांधून तोंडात कापडाचा त्यानंतर चोरट्यांनी कंटेनर चाकण बाजूकडे कच्चा रोडवर नेला. कंटेनर सील तोडून त्यामधील पाच लाख 67 हजार 983 रुपये किमतीचे हायर कंपनीचे एकूण 87 वॉशिंग मशीन त्याच प्रमाणे हायर कंपनीचे 27 लाख 94 हजार 922 रुपये किमतीचे 32 इंच 319 एलईडी टीव्ही त्याचप्रमाणे चालकाचा मोबाईल व रोकड, असा एकूण 33 लाख 65 हजार 905 रुपये किमतीचा माल बळजबरीने काढून घेतला. त्याच प्रमाणे कंटेनर चालकाचा कंटेनर इंदोरी टोलनाक्याचे पुढे सोडून देऊन निघून गेले.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चार चोरट्यांवर भारतीय दंड विधान कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चाकण पोलीस करत आहेत.

Visit : Policenama.com