भाजपा ‘त्या’ मंत्र्यांना डच्चू देणार ?, BJP कडून नव्या दमाच्या मंत्रिमंडळाची तयारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अजून सत्ता स्थापनेवरुन गोंधळ सुरु असताना भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी बनवण्याचे काम सुरु झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबाबत चर्चा झाल्याचे कळते आहे. प्रादेशिक संतुलन साधत नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे.

राज्यात विधानसभेला विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांना भाजपने तिकीट वाटपावेळी डच्चू दिला होता. तर निवडणूकीत पंकजा मुंडे, अनिल बोंडे, राम शिंदे हे तीन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले. यामुळे आता या मंत्रालयाची खाती कोणाला मिळणार याची चर्चा आहे. तर विद्यमान मंत्र्यापैकी तीन ते चार जणांना डच्चू दिला जाऊ शकतो आणि त्या जागी नव्या नेत्यांना भाजपकडून संधी दिली जाऊ शकते.

या जिल्ह्यातून मंत्रीपदाची संधी हुकण्याची शक्यता
मागील मंत्रीमंडळात विदर्भातून मुख्यमंत्र्यासह सहा कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री भाजपचे होते. विदर्भातून भाजपचे 44 आमदार निवडणूक आले होते, यंदाच्या विधानसभेला ही संख्या कमी होऊन 29 वर पोहचली. त्यामुळे यंदा मंत्रिमंडळात विदर्भाची ताकद कमी पडणार असे म्हटले जात आहे. परंतू मुंबईसह कोकणात भाजपचे संख्याबळ 1 ने वाढले. ते 26 वरुन 27 झाले. तर कोल्हापूर, पालघर मतदारसंघातून भाजपला चांगले प्रदर्शन करता न आल्याने तेथील मंत्रीपद देखील गेले. पुणे, अहमदनगर, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यात देखील भाजपची वाताहात पाहायला मिळाली.

जळगावात देखील 2014 सारखी पुनरावृत्ती झाली नाही. संख्याबळ देखील घटले. बुलडाणा, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात देखील भाजपला झटका बसला. मतदारसंघातील भाजपच्या ताकदीचा विचार करुन मंत्रिपदांबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते आहे.

यावरुन दिसते आहे की भाजपचे चांगले प्रदर्शन दाखवणाऱ्या जिल्ह्यातून मंत्रीपदे देण्यात येऊ शकतात. मुंबई, ठाणे, अकोला, यवतमाळ, वर्धा, औरंगाबाद, जालना, नाशिक शहर, सातारा, सोलापूर जिल्हा येथे भाजपने चांगले प्रदर्शन दाखवले आहे. यानुसार याद्या तयार करुन पक्षश्रेष्ठीकडून मंजुरी मिळवून निर्णय घेण्यात येतील.

भाजप मंत्रीमंडळात ‘लॅक ऑफ टॅलेंट’ असल्याची टीका फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळावर सातत्याने करण्यात येत होता. 4 – 5 मंत्री सोडले तर इतर मंत्रिपदांच्या कामांवर लोकांकडून आक्षेप घेण्यात येत होता. त्यामुळे फडणवीस हे हा आक्षेप दूर करण्यासाठी चांगले मंत्रिमंडळ बनवण्याच्या प्रयत्नात आहेत.

अनेकदा निवड करताना जातीपातीचा विचार करुन चेहऱ्यांना संधी दिली जाते परंतू यंदा तसा विचार झाला तर योग्यतेचा निकष काही अंशी बाजूला राहू शकतो. पहिल्यांदा फडणवीसांच्या नजीकचे चेहरे मंत्रिमंडळात नव्हते परंतू आता फडणवीसांच्या जवळचे चेहरे मंत्रिमंडळात निश्चित असल्याचे मानले जात आहे.
Visit : policenama.com