मेट्रोचे काम सुसाट…भुयारी मेट्रो मार्गातील आव्हानात्मक टप्पा पूर्ण

पोलिसनामा ऑनलाईन – पुणेकरांच्या दिमतीला मेट्रोने जाण्याची संधी लवकरच मिळणार असल्याचे कामावरुन दिसून येत आहे. मेट्रोने शेतकी महाविद्यालय ते स्वारगेट या भुयारी मार्गातील आव्हानात्मक टप्पा काल पूर्ण केला आहे. शेतकी महाविद्यालय ते जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. टनेल बोरिंग मशिन (टीबीएम) द्वारे 10 महिन्यात 1 हजार 600 मीटरच्या बोगद्याचे काम महामेट्रोकडून करण्यात आले आहे. आता नदीपात्राखालून बोगद्यासाठी खोदाईचा टप्पा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिके मध्ये 5 किलोमीटर लांबीचा मार्ग हा भुयारी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून भुयारी मार्गाच्या कामाला प्रारंभ झाला. भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी प्रस्तावित स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून त्याखाली बांधकाम करण्यात येत आहे. भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने सुरू आहे. त्यासाठी चीन येथून ही यंत्रे आणण्यात आली आहेत. शेतकी महाविद्यालयापासून भुयारी मार्गाचा बोगदा करण्यास सुरुवात झाली होती. काल जिल्हा सत्र न्यायालयापर्यंतचे काम पूर्ण झाले. मेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ, टाटा प्रोजेक्ट कं पनीचे राजेश जैन आणि बेनी जोसेफ, मेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.