सांगलीतील बालगावमध्ये 884 वर्षांपूर्वीच्या चालुक्यकालीन शिलालेखाचा शोध

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली येथील जत तालुक्यातील बालगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेले शेवटचे गाव आहे. पंढरपूर-विजापूर महामार्गावर वसलेल्या या गावाला प्राचीन इतिहास आहे. येथील अल्लमप्रभूचे देवस्थान हे राज्यात प्रसिध्द आहे. चालुक्यराजा तिसरा सोमेश्वर उर्फ भूलोकमल्ल याच्या कारकिर्दीतील त्याचा मांडलिक बिज्जल कलचुरी याने दिलेला दानलेख मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर व मानसिंगराव कुमठेकर यांनी शोधून काढला आहे. ते तेथे संशोधन करीत होते. तेव्हा त्यांना अल्लमप्रभू देवस्थानाजवळ हळेकन्नड लिपितील तो शिलालेख सापडला आहे.

सन ११३७ मधील हा लेख असून, यामध्ये बालगाव येथील कळमेश्वर स्वामी यांना दान दिल्याचे म्हटले आहे. जवळपास ८८४ वर्षांपूर्वीच्या या लेखातून सांगली जिल्ह्याच्या तत्कालीन राजकीय व धार्मिक इतिहासावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान तो शिलालेख भग्नावस्थेत होता. त्याच्या वरच्या भागातील १३ ओळीच फक्त शिल्लक राहिल्या आहेत. या शिलालेखावर सुर्य-चंद्र, शिवलिंग, गाय-वासरू, कटय़ार अशी चिन्हे कोरली आहेत. हा शिलालेख पूर्वी मारुतीच्या देवळात होता. बालगांवमधील लेखात तो मंगळवेढे येथून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. या लेखात त्याला लावलेल्या विशेषणांमध्ये युध्दात शत्रूला अत्यंत घनघोर वाटणारा, शूरवीरांचा सूर्य, कलिकालाच्या गळ्यावर रोखलेला अंकुश, शत्रूरुपी हत्तींचा नाश करणारा सिंह, निर्भयपणे पराक्रम गाजविणारा वीर आणि परनारी सहोदर म्हणजे परस्त्रीचा बंधू यांचा समावेश आहे.

दरम्यान, बिज्जल कलचुरी याच्या ताब्यात सध्याच्या सांगली जिल्ह्याचा बहुतांशी भाग होता. त्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागात त्याचे शिलालेख आजवर आढळून आले आहेत. यामध्ये देशिंग-बोरगांव, भाळवणी, वळसंग याठिकाणी त्याच्या कारकिर्दीतील शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमधून कल्याणीचे चालुक्य राजे आणि त्यांचे मांडलिक असलेल्या कलचुरी राजसत्तांची माहिती मिळते.