खून-दरोड्याच्या 500 केस पण ‘रॉबिन हुड’ सारखी होती ‘मोहरसिंग’ची प्रतिमा

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   तुम्ही शोले चित्रपटाचा हा डायलॉग ऐकला असेल ज्यात दरोडेखोर म्हणतात की, ‘बेटा सो जा नहीं तो गब्बर आ जाएगा’. होय, अशीच काहीशी चंबलच्या जंगलांमध्ये दरोडेखोर मोहरसिंगची भीती होती. श्रीमंतांमध्ये त्याची जेवढी भीती होती तितकाच गरिबांमध्ये तो त्याच्या मदतीसाठी लोकप्रिय होता. कदाचित म्हणूनच लोक त्याला रॉबिन हूड म्हणायचे.

चंबल येथील प्रसिद्ध दरोडेखोर मोहरसिंग याचे वयाच्या 93 वर्षी मध्य प्रदेशातील भिंड येथे निधन झाले. मोहरसिंग 70 आणि 80 च्या दशकात आपल्या मोठ्या मिशांमुळे देशभरात ओळखला जात होता. असे म्हटले जाते की, दरोड्याच्या घटनेच्या वेळी, तो एका महिलेवर हातही उगारत नसे त्यामुळे तो प्रचलित होता.

दरोड्याच्या वेळी मोहरसिंग जे पैसे आणि रेशन लुटत असे ते गोरगरीब व असहाय लोकांमध्ये वाटत असे. इतकेच नव्हे तर लुटलेल्या पैशांनी गोरगरीबांच्या मुलींची लग्नही करायचा, यामुळे चंबल परिसरातील लोकही त्यांचा आदर करत असत.

1972 मध्ये जननायक जय प्रकाश नायरन यांच्या आवाहनावर त्याने दरोड्याचा मार्ग सोडला आणि आपल्या गटाच्या 140 दरोडेखोरांसमवेत आत्मसमर्पण केले आणि आठ वर्षे तुरुंगात घालविल्यानंतर, त्याची अकाली सुटका झाली आणि त्यानंतर त्याने उर्वरित आयुष्य चांगले घालवले. त्यावेळी त्याच्यावर खून, अपहरण आणि इतर सर्व गुन्ह्यांबरोबर एकूण 500 गुन्हे दाखल होते.

मोहरसिंग देखील दरोडेखोर म्हणून देशात इतका लोकप्रिय झाला होता की, त्याच्यावर 1982 मध्ये ‘चंबल का डाकू’ चित्रपटही आला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याने स्वतः दरोडेखोराची भूमिका साकारली होती.