जेजुरीत आजपासून ‘चंपाषष्ठी’ उत्सव !

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – जेजुरीच्या खंडोबा गडावर आजपासून (बुधवार, २७) खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी षडरात्र उत्सवाला (देवदिवाळी) प्रारंभ होत आहे. आज सकाळी गडावर घटस्थापनेनंतर उत्सवाला सुरवात होईल. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठान, पुजारी सेवक व देवसंस्थानच्या वतीने गडावर सहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज सकाळी दहा वाजता करवीरपीठाच्या शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सहा दिवस गडावर दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत अन्नदान होणार आहे. गुरुवारपासून मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण सुरू होईल. शनिवारी मल्हारी सहस्त्रनाम याग व देवाची देवदिवाळी फराळ कार्यक्रम होणार आहे.

रविवारी (ता. १) सायंकाळी गावात तेलहंडा मिरवणूक व त्यानंतर रात्री देवाला हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि. २) सकाळी खंडोबाचे घट उठल्यानंतर चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होईल. या दिवशी भाजीभाकरी, वांगे, भरीत, रोडग्याच्या महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सहा दिवस दररोज सायंकाळी ते सात या वेळेत वाघ्या – मुरळीच्या हजेरीचे कार्यक्रम होणार आहेत. शिवाय दररोज धार्मिक विधीच्या काळात सनई चौघडा वादन होणार आहे. गडाभोवताली आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे गाभाऱ्यात फुलांची सजावट केली जाणार आहे.

Visit : Policenama.com