तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सावानिमित्ताने घेतले हजारो भाविकांनी दर्शन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर चंपाषष्टीचे औचित्य साधून पन्नास हजाराहून अधिक भाविकांनी ‘सदानंदाचा येळकोट’, येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या गजरात भंडार खोबऱ्याच्या उधळणीत कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. खंडोबा देवाला वांग्याचे भरीत, पाच धान्याच्या पिठाचा रोडगा, कांद्याची पात, पुरण पोळीचा नैवद्य दाखवून चंपाषष्ठी उपासनेची सांगता केली.

सोमवारी (दि. २) सकाळी देवाची महापूजा, महाभिषेकानंतर बालदारीतील खंडोबा देवाचे घट उठवण्यात आले. ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने उत्सव मूर्तीवर दुधाचा अभिषेक घालण्यात आला. अभिषेकानंतर खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती वाजत गाजत मुख्य मंदिरात नेण्यात आल्या. कुलधर्म कुलाचार प्रमाणे तळी भंडार, दिवटी, बुडली पेटवून घरोघरचे घट उठविण्यात आले. जेजुरीत धार्मिक विधींमुळे सर्वत्र खंडोबामय वातावरण पाहण्यास मिळाले, दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्धषष्ठी या कालावधीत जेजुरी गडावर चंपाषष्टी उत्सव साजरा होतो.

मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्तंड भैरवाने दानवांशी युद्ध सुरू केले ते सहा दिवस चालले. षष्ठीला देवाने दानवांवर विजय मिळवला. ऋषी मुनींनी चाफ्याच्या फुलांनी देवाची पूजा करून विजय दिवस साजरा केला. अशी आख्यायिका असून तेव्हापासून हा उत्सव साजरा होत आहे. या सहा दिवसात राज्यातून आलेल्या हजारो भाविकांनी जेजुरी गडावर येवून देवदर्शन घेतले. जेजुरीकर हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. जय मल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सहा दिवसात दोन लाखावर भाविकांना अन्नदान केले.

चंपाषष्ठी उत्सवाच्या सांगता प्रसंगी ५०० किलो वांग्याचे भरीत सुमारे पाच हजार बाजरीच्या भाकरी ८०० किलो तांदुळाचा भात तसेच ५०० किलो बुंदी आदी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

Visit : policenama.com