चाणक्य नीती : ‘या’ गोष्टी कोणाशीही शेअर करू नयेत, लपविलेल्याच बऱ्या, कोणत्या ते ‘जाणून घ्या’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती ग्रंथात म्हणजेच चाणक्य नीती (Chanakya Niti) मध्ये मानवाचे जीवन सरळ आणि यशस्वी करण्याशी संबंधित अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत. चाणक्य नीतीच्या 14 व्या अध्यायातील 17 व्या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, बुद्धिमान व्यक्तीने आपल्या कोणत्या गोष्टी इतरांना सांगू नयेत. या गोष्टी इतरांना सांगितल्यास अपमान सहन करावा लागू शकतो. यासोबतच वाईट काळात समाजातील लोकांची साथदेखील मिळत नाही. चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे हे स्पष्ट केले आहे…

सुसिद्धमौषधं धर्मं गृहच्छिद्रं च मैथुनम् ।
कुभुक्तं कुश्रुतं चैव मतिमान्न प्रकाशयेत् ॥

औषधांविषयी कोणालाही सांगू नये
चाणक्य नीतीनुसार, कोणालाही आपल्या औषधांबद्दल सांगू नये. आपण कोणत्या आजाराने त्रस्त आहोत आणि कोणती औषधे घेत आहात हे कोणालाही सांगू नये. इतरांना आपल्या औषधांबद्दल सांगण्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

घरातील रहस्य
चाणक्य नीतीनुसार आपल्या घराचे रहस्य कोणालाही सांगू नये. आपण कितीही त्रस्त असाल तरीही आपल्या घरातील दोष कोणालाही सांगू नका. घरातील रहस्य इतरांना सांगितल्याने शत्रू त्याचा फायदा घेऊ शकतात.

कुटुंबातील वाईट गोष्टी
कुणीही कुटुंबातील सदस्यांच्या वाईट गोष्टी इतरांसमोर मांडू नयेत. जर एखाद्या सदस्यामध्ये काही कमतरता असेल तर त्याबाबतदेखील कोणालाही सांगू नये. जेव्हा कुटुंबातील वाईट गोष्टी इतरांना समजतात तेव्हा कौटुंबिक उपहास होतो, ज्यामुळे आपल्या सन्मानाला ठेस पोहोचते.

लैंगिक संबंध
पती-पत्नीने कोणालाही त्यांचे वैवाहिक जीवन किंवा संबंधांबद्दल सांगू नये. लैंगिक संबंध प्रस्थापित करताना एखादी चूक झाली असेल तर ती चूक इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नये.

संपत्ती आणि मंत्र
आपल्या संपत्तीबद्दल कोणालाही कधीही सांगू नये. आपण जर एखाद्या मंत्राचा जप करत असाल, तर तो मनातच ठेवल्यास त्याचा अधिक प्रभाव होतो. याव्यतिरिक्त चाणक्य म्हणतात की वाईट आणि निंदनीय शब्द स्वत:कडेच ठेवणे अधिक चांगले असते. यामुळे समाजात आदर टिकून राहतो.