कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, पुणे, सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या 2 व 3 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात 3 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या संदर्भात पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरु आहे. पुढील दोन दिवसांनी कोकणात तसेच पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 3 ते 4 दिवसानंतर राज्यातील पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (दि.30) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर कोकण, गोवा व मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 1 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2 व 3 जुलै रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.