मुंबईकरांनो सावधान ! पुढचे 3 दिवस अनावश्यक घराबाहेर पडू नका, ‘हे’ आहे कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई परिसरामध्ये रविवारी (दि.12) दिवसभर पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबईसह ठाणे, पालघरमधील काही भागात गुरुवारपर्यंत जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर रायगड जिल्ह्यात मंगळवारी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत आज पुन्हा पावसाची रिपरीप सुरु होती. मुंबई उपनगरात अधून मधून पावसाच्या जोरादार सरी कोसळल्या होत्या. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत संपलेल्या 24 तासात कुलाबा येथे 14 मिमी आणि सांताक्रुझ येथे 52 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला होता. त्यामुळे उकाडा जाणवत होता.

रविवारी पावसाला सुरुवात झाल्याने कमाल तापमानात 4 अंशाची घट नोंदवण्यात आली आहे. शनिवारी कुलाबा येथे 32.4 आणि सांताक्रुझ येथे 32.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. तर रविवारी संध्याकाळी कुलाबा येथे 29.6 अंश सेल्सिअस कमाल आणि 25 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. पुढील दोन दिवस याच पातळीवर तापमान राहण्याचा अंदाज आहे.