चंदीगडमध्ये मुलींच्या होस्टेलमध्ये लागली भीषण आग, 3 विद्यार्थीनी जिवंत जळाल्या तर दोघींची प्रकृती ‘चिंताजनक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगड शहरात आज (शनिवार) संध्याकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. शहराच्या सेक्टर 32 डी मध्ये एका घरात चालवण्यात येणाऱ्या विद्यार्थीनी वसतीगृहामध्ये (गर्ल्स पीजी) ही आग लागली. या आगीत तीन मुली जिवंत जळाल्या तर दोन मुलींची स्थिती नाजूक आहे. एका मुलीने पेइंग गेस्ट हाऊसच्या पहिल्या मजल्याच्या छतावरुन उडी मारत स्वत:चा जीव वाचवला. ती देखील गंभीर जखमी झाली आहे.

घटनेत मृत झालेल्या मुलींची नावे रिया, पंछी आणि मुस्कान अशी आहेत. यातील दोघी मूळच्या पंजाब आणि एक हरियाणाची रहिवासी आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांनी या पीजी हाऊसमधून धूराचे लोट बाहेर येताना पाहिले. यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहेत. आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेव्हा आत जाऊन पाहिले तेव्हा 5 मुली जळालेल्या अवस्थेत असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाहिले. या मुलींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. यात तीन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघींची स्थिती नाजूक आहे.

मृत झालेली मुस्कान हरियाणाच्या हिसारची आहे तर रिया आणि पंछी पंजाबच्या कोटकपूराच्या आहेत. मुलींचे वय 18 ते 22 वर्षा दरम्यान आहे.

या पीजीमध्ये जवळपास 25 विद्यार्थीनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. परंतु सध्या येथे चार-पाच मुलीचं राहत होत्या. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सांगण्यात येत आहे की हे पीजी हाऊस नोंदणीकृत नाही. येथे अवैध पद्धतीने पीजी हाऊस चालवण्यात येत होते.