Lockdown : ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थेट मोदी सरकारला लिहीलं पत्र, दारूची दुकानं उघडण्यासाठी मागितली परवानगी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आले असून अशा परिस्थितीत दारूची दुकानेही बंद आहेत. मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यासंदर्भात गृह मंत्रालयाला पत्र लिहित राज्यात दारूची दुकाने सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे मान्यता मागितली आहे. सीएम अमरिंदर यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत टप्प्याटप्प्याने सशर्त दारूची दुकाने उघडण्यास परवानगी मागितली आहे.

३ मे पर्यंत लॉकडाऊन मध्ये शिथिलता नाही

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रविवारी म्हटले होते की, राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन मध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. सरकारने सांगितले की, राज्यात लॉकडाऊन संपवण्याबाबत कोणताही निर्णय तज्ञ समितीने अहवाल सादर केल्यानंतरच घेण्यात येईल. अशी अपेक्षा आहे कि या आठवड्यात समिती आपला अहवाल सादर करेल.

रमजानबाबत दिले आदेश

मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी उपायुक्तांना सर्व जिल्ह्यांमध्ये कर्फ्यूची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या रमजान महिन्यातही कर्फ्यू पास (परवानगी पत्र) न देण्यास सांगितले आहे.

मंगळवारी पंजाबमधील ६ लोकांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आला असून राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या २५१ झाली आहे. यातील ४९ लोक बरे झाले असून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.