मंत्रिमंडळ बैठकीला ‘दांडी’ मारून पत्रकार परिषद घेत नवज्योतसिंग सिध्दूकडून काँग्रेस नेतृत्वाला आव्हान

चंदीगढ : वृत्तसंस्था – पंजाबचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आज पंजाब सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी झाले नाहीत. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याशी असलेल्या वादामुळे नवज्योतसिंग सिद्धू कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले नाहीत. नवज्योतसिंग सिद्धूने वेगळी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि काँग्रेस नेतृत्वाला थेट आव्हान दिले आहे. नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, मी कोणत्या व्यक्तीला उत्तरदायी नसून पंजाबच्या जनतेप्रती माझे उत्तरदायित्व आहे. एक दोन दिवसात सिद्धू मोठी घोषणा करतील, असा अंदाज बांधला जात आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी नवज्योतसिंग सिद्धू यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे कॅप्टन अमरिंदरसिंग आणि बरेच मंत्री सिद्धूवर नाराज आहेत. अमरिंदर यांनी सिद्धूला अकार्यक्षम मंत्री संबोधले आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी सिद्धूने त्यांच्या विभागाची आकडेवारी देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील दरी वाढतच चालली आहे. आज सिद्धू कॅबिनेट बैठकीत सहभागी होतील आणि दोघांमधील संबंध सुधारतील असे वाटते होते पण तसे काहीच घडले नाही.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांना नवजोत सिंह सिद्धू यांच्याकडील स्थानिक स्वराज्य संस्था विभाग काढून घ्यायचा आहे. उद्या किंवा परवाच या संबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वात गोंधळाची परिस्थिती आहे म्हणून सिद्धूच्या बाबतीत लवकर निर्णय घेतला जात नाहीये.

लोकसभा निवडणुकीत भठिंडा आणि गुरदासपुर जागेसह चार जागांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. सिद्धूने सांगितले की, पंजाबमधील शहरी लोकसभा निवडणुकीमधील काँग्रेसच्या विजयामध्ये माझ्या विभागाच्या कामाची महत्वाची भूमिका होती. मुख्यमंत्र्यांनी मला दोन जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. दोन्ही जिल्ह्यामध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे.