एन.चंद्राबाबू नायडू यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंभीर टीका 

प्रकासम : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यावर सडकून टीका केली आहे.  के. चंद्रशेखर राव हे खुनशी आणि गुन्हेगारी राजकारण करत आहेत. तर प्रशांत किशोर हे बिहारी दरोडेखोर आहेत असे म्हणत त्यांच्यावर आपली तोफ डागत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय पक्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधताना चंद्राबाबू म्हणाले की, “के. चंद्रशेखर राव हे खुनशी आहे, गुन्हेगारी राजकारण करत आहेत. ते कॉंग्रेस आणि टीडीपीच्या आमदारांना पकडत आहेत. “तर प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना चंद्राबाबू नायडू म्हणाले की, “बिहारी दरोडेखोर (डाकू) प्रशांत किशोर यांनी आंध्र प्रदेशमधील लाखो मतदार हटविले आहेत. ते सायबर गुन्हा करत आहेत.”

यापूर्वीही एन. चंद्राबाबू यांनी वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी, टीआरएस आणि भाजपावर मतदार यादीतून मतदारांची नावे हटवल्याचा आरोप केला होता.  यावेळी एन. चंद्राबाबून म्हणाले की, “वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी टीआरएस आणि भाजपासोबत मिळून मतदार यादीतून मतदारांची नावे हटवण्याचा प्रयत्न केला होता. मतदारांची नावे मतदार यादीतून हटवण्यासाठी त्यांनी फॉर्म 7 घेतला होता. त्यामुळे फॉर्म 7 घेणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला हवेत.”