‘राम’-‘चंद्रां’मध्ये ‘तिळगुळ घ्या अन् गोडगोड बोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत भाजप-शिवसेना नेत्यांनी एकमेकांना तिळगूळ देत युतीच्या मार्गावर एक पाऊल उचल्याचं दिसत आहे. भाजपने शिवसेनेला तिळगूळ देऊन गोडगोड बोलण्याची विनंती केली. यावर शिवसेनेनेही उत्तर देत, आमच्याशी भांडू नका, अशी विनंती केली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिळगुळाचं वाटप केलं. युतीमधील कटुता बाजूला सारून संबंध सुधारण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी शिवसेना मंत्र्यांना तिळगूळ दिला. तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या या तिळगुळावर शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनीही साजेसे उत्तर दिलं. आमच्याशी फक्त भांडू नका, असा चिमटा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काढला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक भाजप सरकारला पाडण्यासाठी एकत्र येत महाआघाडी तयार केली आहे. त्यात शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चाही तशीच जोरदार सुरु आहे. हे दोन पक्ष एकत्र येणार की नाही याबाबत अद्याप चित्र काही स्पष्ट नाही. कारण शिवसेना भाजपवर आणि भाजप शिवसेनेवर टीका करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. त्यात हे तिळगुळ देऊन नातं गोड करण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपुर्वी युतीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरु असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते. त्यात आज तिळगुळ देऊन भाजपने यावर शिक्का मोर्तब केला आहे. मात्र यावर शिवसेनेची नेमकी भूमिका काय असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचे आहे.