चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, म्हणाले – ‘तुम्ही सत्तेत येताच मराठा आरक्षणाचा खून केला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला आहे. या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राज्यातील ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा खून केला आहे. या आरक्षणाचा मुडदा पाडला आहे. हे आरक्षण मातीमोल केले आहे, असा हल्लाबोल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा आरक्षणावर अभ्यास करण्यासाठी भाजपाने एक समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक रविवारी झाली. त्यानंतर पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील चर्चेची माहिती दिली. यावेळी पाटील म्हणाले, फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण दिले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवले होते आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केल्याची टीका पाटील यांनी केली. तसेच ठाकरे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. तसेच मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहणार आहोत. या आंदोलनात आमचा झेंडा राहील. पण पक्षाचे नाव राहणार नसल्याचे पाटील म्हणाले. तसेच मराठा आरक्षण हा राज्याचा विषय असल्याने राज्यानेही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे, असे पाटील म्हणाले.