Chandrakant Patil : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणाचं गांभीर्य नाही’

कोल्हापूर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. मराठा आरक्षणाबाबत या सरकारमधील कोणाचाच अभ्यास नाही. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्री यांना या प्रकरणाचे गांभीर्य नाही. या नेत्यांना मराठा समाजातील गरीब वर्ग पुढे येऊ द्यायचा नाही, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव आल्याने ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाची मूळं लांबपर्यंत गेली असून, सरकार तुमचं असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसं काय करत आहेत’. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार गंभीर नाही. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणारे नव्हते अशी टीका करणे हे चुकीचे आहे. आपले यश झाकण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय लागावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाचा अवमान करत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

गायकवाड आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयाकडून मान्य

घटनेच्या चौकटीत मागास आयोगाची स्थापना झाली, मराठा समाज मागास आहे हे आयोगाने मांडले आहे. गायकवाड आयोगाचा अहवाल उच्च न्यायालयाने मान्य केला. असाधारण स्थिती निर्माण झाली. हे गायकवाड आयोगाने मांडले, असे पाटील म्हणाले.