Chandrakant Patil : ‘उद्धव ठाकरेंचे पाय आता जमिनीवर आहेत, आनंद आहे’ (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुससान झाले असून अनेक नेते नुकसान झालेल्या भागाचा पाहणी करण्यासाठी कोकण दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवासांच्या दौऱ्यावर आहेत. तर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोकणाचा दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावरुन राजकारण पेटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ, प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, सरकार आल्यापासून उद्धव ठाकरे यांचे पाय हवेत गेले होते. पण आता ते बाहेर पडले आहेत. ते आता जमिनीवर आले आहेत. मला याचा आनंद आहे, अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला वगळून हवाई मार्गे गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावरुन सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाहणीसाठी सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे हवाई मार्गेच पाहणी करा असा सल्ला गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला होता. एवढंच नाहीतर महाराष्ट्रात पाहणी करण्यासाठी इथलं हवामान योग्य नाही. त्यामुळे ते महाराष्ट्रात आले नाहीत, असा खुलासा पाटील यांनी यावेळी केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी नाही, तर कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करत आहे. हेलिकॉप्टरमधून नाही, तर जमिनीवर उतरुन मी पाहणी करण्यासाठी आलो आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. तसेच माझा दौरा चार तासांचा आहे. मला फोटोसेशन करण्यात रस नाही, कारण मी स्वत: फोटोग्राफर आहे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.