‘हे’ ठाकरे सरकारला महागात पडणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मिठागर ही केंद्राची प्रॉपर्टी आहे. कांजूरमार्गच्या जागेवर केस सुरू आहे. मिठागर नष्ट करून त्या ठिकाणी बिल्डींग उभी करण हे ठाकरे सरकारला महागात पडणार आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Bacchu Patil) म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील सध्या 2 दिवसांच्या भाजप दौऱ्यावर आहेत. पत्रकारांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “या प्रकरणात सरकार घटना, नियम पाळत वा समजून घेत नाही. बाफणा नावाच्या आमदाराच्या पुत्रानं यातील काही जमिनीवर दावा केला होता. तो महसूलानं फेटाळला होता. त्यानंतर ते हायकोर्टात गेले. इथल्या सगळ्या जागेच्या हस्तांतरावर स्थगिती आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2015 ला कारशेड करण्याचा प्रयत्न केला. परंतु कोर्टानं 3700 कोटी भरायला सांगितले. ते परवडणारे नव्हते. मिठागर आयुक्त कोर्टात गेले होते” असंही पाटील यांनी सांगितलं.

अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेवर बोलताना पाटील म्हणाले, “अर्णब यांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. ही ठोकशाही आहे. अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू. हे जुनं प्रकरण आहे. त्याची फाईल बंद झाली होती. तरी पण हे सगळं करण्यात आलं. आणीबाणी प्रमाणे काहीही केलं तरी चालेल या भ्रमात सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहू नये” असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.

अन्याय अत्याचाराच्या विरोधात सर्वांनीच उतरलं पाहिजे. या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र अर्णबला ज्याप्रमाणे अटक झाली ते योग्य नाही असंही पाटील म्हणाले आहेत.