‘जनादेशाचा ‘अनादर’ ! महाराष्ट्रात ‘अभद्र’ सरकार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रदेश राज्य परिषदेमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर बोलताना त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका केली. महायुतीचे सरकार येणार असल्याचे वाटत असताना विश्वासघात झाला. जनादेश होता की भाजप आणि शिवसेनेने मिळून सरकार स्थापन करावे. मात्र, मिळालेल्या जनादेशाचा अनादर करत महाराष्ट्रात एक अभद्र सरकार आले आणि अनैतिक युती झाल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त मते भाजपला मिळाली असून याची सर्वसामान्यांना माहिती आहे. तर लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला तर लोकांची हिच इच्छा होती की, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचे युतीचे सरकार चाललं पाहिजे. मागील वेळेपेक्षा यावेळी भाजपचा जिंकण्याचा वेग जास्त होता असेही चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या प्रदेश राज्य परिषदेला संबोधित करताना म्हटले आहे.

यावेळी शिवसेनेवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिवसातून दोन – दोन वेळा जाण्यासाठी वेळ होता. दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ होता. मात्र, महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला फोन घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. शिवसेनेने फक्त भाजपच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता व शेतकऱ्यांसोबत दगा केला असल्याचे त्यांनी म्हटले.

You might also like