‘मुख्यमंत्रिपद हे उध्दव ठाकरेंचं काम नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना – भाजप यांच्यातील वादामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ला सोबत घेऊन राज्यात आपले सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप सगळ्यांत मोठा पक्ष ठरून सुद्धा सत्तेपासून दूर राहिला. भाजप सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आला आहे. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली आणि उद्धव ठाकरेंना एक वेगळाच सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री होण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, दोन तीन वेळा आमदार व्हावे लागते. राजकारणातील सर्व बारकावे शिकावे लागतात. उद्धव ठाकरे हे प्रेमळ आहेत, सरळ मार्गाने पुढे जाणारे आहेत, त्यांनी सरकार चालवण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात केलेली दिसत नाहीत, त्यामुळे  मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंचे कामच नाही, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

‘सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं’
मुख्यमंत्री पद हे उद्धव ठाकरेंचे काम नाही, त्यांनी मुख्यमंत्री पद हे दोन ते तीन वेळा आमदार राहिलेल्या किंवा मंत्री राहिलेले नेत्यांना द्यायला हवे होते. अनुभवी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद द्यायला हवे होते. जी माणसे न शिकता वरच्या वर्गात जातात, त्यांचे करिअर नीट घडत नाही असा टोलाही त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना यावेळी लगावला.

‘मुंबईत हिंदू आणि मराठी माणूस शिवसेनेमुळे’
चंद्रकांत पाटलांनी आपल्या बालपणीचा एका किस्सा सांगितला. आज मुंबईत हिंदू आणि मराठी माणूस आहे तो केवळ शिवसेनेमुळेच आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्या काळात आम्ही राहत असलेल्या भागात मुस्लिम समाजाचे प्रभुत्व होते. ज्यावेळी हिंदू-मुस्लिम दंगल होत असे तेव्हा शिवसेनेत असलेले छगन भुजबळ हे आम्हाला त्यांच्या वाडीत घेऊन जात असत. शिवसेनेचा त्याबद्दल मी कायमच आभारी राहणार आहे. उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री म्हणून टीका केली तरी त्यांच्याबद्दल प्रेम असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.