‘जे साहस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं तसं धाडस शरद पवारांनी दाखवून मुंडेंचा राजीनामा घ्यावा’ – चंद्रकांत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अनेक नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर अखेर आज संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला. वर्षा बंगल्यावर झालेल्या तासभराच्या चर्चेनंतर राठोड यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी जे केलं, तेच आता शरद पवार यांनी करावे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत. त्यांनी यापूर्वीच ठाकरे बाणा दाखवायला हवा होता. मुख्यमंत्र्यांनी उशिरा का होईना, वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेच आता सर्व चौकशी निष्पक्ष झाली पाहिजे आणि हत्या की कोणाच्या दबामुळे आत्महत्या केली हे सर्व जनतेसमोर येणं गरजेचं असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवारांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा
ज्या प्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साहस दाखवले. तसे साहस शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मुद्यावर दाखवावे. त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तर सरकारची थोडी इज्जत वाचेल
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना म्हटले की, आम्ही वारंवार ही मागणी केली होती की धनंजय मुंडेंच्या मुद्यावरही हाच निर्णय घेतला गेला तरच सरकारची थोडीफार इज्जत वाचू शकते. नैतिकतेच्या आधारावर अशा मुद्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर पाऊल उचललीच पाहिजेत.