भाजपाच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना ‘गॅसवर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपाचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेच्या जागांचा फॉर्म्युला जाहिर केल्यामुळे शिवसेना नाराज झाली आहे. मित्र पक्षांना दिलेल्या १८ जागा त्यांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवाव्यात असा भाजपाचा प्लॅन असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र भाजपाचा मित्र पक्ष रासपने याला विरोध केला असून रासप स्वत:च्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले आहे.

मित्र पक्षांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणुक लढवल्यास भाजपच्या पदरामध्ये अधिक जागा पडतील त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये शिवसेना भाजपाची युती झाली. लोकसभा निवडणुकीत युतीला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या आहेत. लोकसभेनंतर राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही शिवसेना भाजपा युती राहील राहणार आहे. राज्यातील २८८ विधानसभांपैकी शिवसेना १४४ आणि भाजपा १४४ या फॉर्म्युल्याप्रमाणे जागावाटप करण्याच्या अटीवरच युती झाली होती.

चंद्रकांत पाटील यांनी १३५-१३५ जागावाटपाचे सुत्र सांगितले आहे. त्यांच्या या सुत्रानुसार भाजपा १३५ आणि शिवसेना १३५ जागांवर निवडणूक लढवतील तर उर्वरीत १८ जागा मित्र पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. मित्र पक्षांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली तर शिवसेना १३५ आणि भजापा १५३ असा नवा फॉर्म्युला तयार होईल. त्यामुळे भाजपच्या या रणनितीमुळे शिवसेना नाराज असून युतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.