Corornavirus : कोथरुडमध्ये फक्त 5 रुपयात घरपोच जेवण, चंद्रकांत पाटलांचा उपक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला असून देशात देखील याचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा म्हणजेच 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषीत केला आहे. यामुळे अनेकांना जेवणाच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गरजूंसाठी केवळ पाच रुपयात घरपोच जेवण देण्याची घोषणा केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केलेल्या उपक्रमानुसार गरजूंना फक्त पाच रुपयात पोळी-भाजी देण्यात येणार आहे. या शिवाय आमदार चंद्रकांत पाटील यांनी 25 टक्के सवलतीच्या दरात डॉक्टरांकडून नियमितपणे देण्यात येणारी औषधं गरजूंना घरपोच पोहचवली जाणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आहे. ही औषधे गरजूंना प्रिस्क्रिप्शननुसार घरपोच केली जाणार आहेत.

असा घ्यावा लाभ
चंद्रकांत पाटील यांनी पाच रुपयात घरपोच पोळी-भाजी मिळवण्यासाठी ‘आ. चंद्रकांतदादा मदत गट 1’ या नावाने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप तयार केला आहे. त्याचा क्रमांक 8262879683 हा असून ज्यांना पोळी-भाजीची आवश्यकता आहे त्यांनी सकाळी 10 पर्यंत या क्रमांकावर मागणी करायची आहे. मागणी करताना गरजूंना आपले नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक व्हॉट्स अ‍ॅप करावा लागेल. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत पोळी-भाजी घरपोच पोहोचवली जाईल. तसेच संध्याकाळी 6 पर्यंत मागणी केल्यानंतर रात्री 9 पर्यंत जेवण घरपोच केले जाणार आहे.

औषधांसाठी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा
ज्या नागरिकांना डॉक्टरांनी नियमितपणे औषधे घेण्यास सांगितली आहेत आणि ज्यांना औषधांची गरज आहे, अशांना प्रिस्क्रिप्शननुसार औषधं घरपोच केली जाणार आहेत. ही सर्व औषधं 25 टक्के सवलतीच्या दरात पोहचवली जाणार आहेत. यासाठी ‘आ. चंद्रकांतदादा मदत गट 2’ या नावाने व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आला असून याचा क्रमांक 9922037062 हा आहे. औषध मिळवण्यासाठी गरजूंनी रोज सायंकाळी 6 पर्यंत या क्रमांकावर प्रिस्क्रिप्शन, नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठवायचा आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी औषधं घरपोच केली जाणार आहेत.

या योजनेचा लाभ केवळ गरजू नागरिकांनी घ्यावा. जेणे करून जास्तीत जास्त लोकांना ही सेवा पुरवता येईल. जे लोक या आवश्यक वस्तू गरजूंना घरपोच देणार आहेत त्यांना ये-जा करणे सहज शक्य व्हावे यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे, आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

You might also like