पवारांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती जिंकणार नाही : चंद्रकांतदादा पाटील

जळगाव : पोलिसनामा ऑनलाईन – बारामती मतदार संघाची जागा जिंकण्याचा दावा भाजप कडून केला जात आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर असा दावा करण्यात येत नाही ना ? अशी शंका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आता त्यांच्या या टीकेला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. ‘शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती निवडून येणार नाही’ असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.

याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती निवडून येणार नाही त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणे लिहायला आता सुरुवात केली आहे. तीन राज्यात आमचा पराभव झाला तो आम्ही मान्य केला. मात्र आता शरद पवारांनी देखील पराभव झाल्यास मान्य करावा” अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

बारामतीची जागा जिंकण्याचा भाजप सातत्याने दावा करत आहे. ईव्हीएम छेडछाडीच्या आधारे तर भाजपकडून असा दावा करण्यात येत नाही ना ? अशी शंका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

नक्की काय म्हणाले शरद पवार ?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निर्णायक लढतीत जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं भाकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. ‘एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी हा दावा केला. त्यामुळे बारामतीचा गड गमावण्याची धास्ती पवार घराण्यांना वाटते आहे का, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

निवडणुकीदरम्यान काही लोकांकडून ईव्हीएम बद्दल बोलले जात आहे. तसेच गुजरात, मध्य प्रदेशात अशा प्रकारच्या घटना घडल्याचं वाचनात आलं. मात्र याबाबत खात्रीलायक माहिती नाही असं पवारांनी सांगितलं. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही, तेही बारामतीची जागा जिंकण्याचं धाडसाने सांगतात, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने काही नियोजन केलं आहे का, अशी शंका अनेकांच्या मनात असल्याचं पवारांनी बोलून दाखवलं.

निवडणूक यंत्रणेवर लोकांचा विश्वास कायम राहायला हवा, परंतु सध्या निवडणूक आयोगाबद्दल येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. असं काही घडलं तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली आहे. पवारांनी केलेल्या भाकितात काही तथ्य आहे का ? की पवारांना बारामतीची जागा गमवण्याची भीती वाटत आहे का ? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभेसाठी बारामती मतदार संघातून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. सुप्रिया सुळे यांची ही सलग दुसरी टर्म आहे. त्यांच्याविरोधात भाजपकडून कांचन कुल यांना तिकीट दिलं आहे. त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात आहेत.