Chandrakant Patil in Pune : वर्षभर लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन हे उत्तर नाही. लॉकडाऊन केले तर तुम्ही एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. वर्षभर लोकं कसे जगले हे मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यामुळे कोरोना वाढत असल्याने लॉकडाऊन न लावता कोरोना टेस्टिंग वाढवून रुग्णांवर लवकर उपचार करून त्यांना बरे करण्यावर सरकारने भर द्यावा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदार संघात हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती परिसरात पोलीस चौकी उभारावी या मागणीसाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, झोपडपट्ट्यांत राहणाऱ्या नागरिकांची अवस्था खूप बिकट आहे. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वस्त्यावस्त्यांमध्ये फिरावे लागेल. प्रत्येक झोपडपट्टीतील नागरिक दिवसभर काही तरी काम करतो. त्यानंतर त्यांना जेवण मिळते. त्यांना तुम्ही आजवर काही दिले नाही. त्यामुळे कोरोनाचे प्रमाण वाढले म्हणून तुम्ही परत लॉकडाऊन लावणार का ? लॉकडाऊन लावायचे असेल तर हातावर पोट असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दर महिन्याला पाच हजार रुपयांचे पॅकेज द्या.

सरकारने लॉकडाऊन लागू न करता  काळजी घेऊन नित्याचे व्यवहार सुरूच ठेवले पाहिजे. नाईट कर्फ्यु सुरू ठेवा, त्याने सर्वसामान्य नागरिकांना काही फरक पडणार नाही. परंतु दिवसभराचे दिनक्रम सुरूच राहिले पाहिजेत. कोरोनावर उपाययोजना म्हणून टेस्टिंग वाढवल्या पाहिजेत, कोरोना झालेल्यांची ओळख लवकर पटवा त्यांच्यावर लवकर उपचार करा, उपचार केंद्र वाढवा. परंतु हे न करता तुम्ही लॉकडाऊन लावत असाल तर हे शक्य नाही. आम्ही लॉकडाउनला कडाडून विरोध करू. व्यापारी, कामगार हे सुद्धा लॉकडाऊनला विरोध करतील, असे यावेळी पाटील म्हणाले.