‘खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या (shivsena) दसरा मेळाव्यात (dasara rally) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी हिंदुत्वावर भाष्य करत भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर भाजप नेत्यांकडून जोरदार टीका केली जात आहे. आता भाजपने मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात आपली अर्वाच्य भाषा, एक अभ्यास शून्य व सुडाने प्रेरित भाषणातून सादर केली. खुर्चीसाठी हिंदुत्त्वाला आपल्या सोयीनुसार चालवणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. राज्यप्रमुख असूनही आपल्या भाषणात एकही सेकंद शेतकऱ्यांसाठी दिला नाही, मग त्या पदाचा काय उपयोग ? असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ‘सोयीचे हिंदुत्व’ अशी फेसबुक पोस्ट लिहून उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्य प्रमुख आहात, याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. कालच्या भाषणात पुन्हा एकदा तुमच्या तथाकथित हिंदुत्त्वाच्या नावानं गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार तुम्ही हिंदुत्त्वाची व्याख्या बदलत आहात, हे प्रकर्षाने जाणवलं, बाळासाहेबांच्या नावानं अजुन किती दिवस पोळ्या भाजणार ? असा सवाल करत खुर्चीसाठी त्यांनी दिलेल्या हिंदुत्त्वाच्या शिकवणीचे पालन करणं तुम्ही विसरला आहात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ?
सरसंघचालक यांनी सांगितलेले हिंदुत्व मानता की नाही ? सरसंघचालक सांगतात हिंदुत्व हे पूजेपर्यंत मर्यादित हिंदुत्व नाही, मंदिर उघडे करा म्हणतात. टोप्या नका घालू विनाकारण काहीही सांगून असा निशाणा त्यांनी भाजपला लगावला होता. आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपला टार्गेट केलं. कंगना राणौतवरही त्यांनी जोरदार टीका केली. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान असल्याचे ठाकरे म्हणाले.