7/12 कोरा करणार्‍यांना सातबार्‍यावर किती कॉलम असतात हे माहिती आहे का ? : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकर आणि हेक्टर मधला फरक कळत नाही. साखरेतल काही कळत नाही. सातबारा कोरा करणार होते त्याच काय झालं, सातबारावर किती कॉलम असतात हे माहिती आहे ? असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लागवताना गृहमंत्री पद घ्यायला घाबरत असाल तर ते खाते शिवसेनेला द्या, या शब्दात भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर शरसंधान केले.

क्रांतीज्योती सावीत्रीबाई फुले जयंतीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी आज फुले स्मारक येथे जाऊन अभिवादन केले. यानंतर सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी ज्या भिडे वाड्यात शाळा सुरू केली त्या वाड्याचे स्मारक व्हावे यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धीरज घाटे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून जनतेची परवड सुरू आहे. सरकार स्थापनेपासून बेकायदा कामकाज सुरू आहे. अद्याप मंत्रिमंडळातील खाते वाटप झालेले नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते. सातबारा वर किती कॉलम असतात याची माहिती तरी आहे ? दोन लाखपर्यंतचे कर्ज माफ केले. पण सातबारावर असलेल्या अन्य बोजा चे काय ? याचा विचार न करता केवळ फसवणूक केलेली आहे, असा टोला त्यांनी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.

नुकतेच साखर सम्राटांच्या एका कार्यक्रमात साखरेचा विषय आला की जयंत पाटलांना विचारा हे मुख्यमंत्र्यांचे उत्तर मिळते या शब्दात चंद्रकांत पाटलांनी ठाकरे यांना चिमटा काढला.

मध्यप्रदेश काँग्रेस सेवादलाने काढलेल्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे शारीरिक संबध होते असा उल्लेख केला आहे. या वृत्तीचा मी निषेध करतो. राज्यातील गाव पातळीपर्यंत भाजप कार्यकर्त्यांनी याचा निषेध करावा असे आदेश मी दिले आहेत. सावरकरांना प्रखर हिंदुत्ववादी मानणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावरकरांचा अगदी खालच्या पातळीवर जाऊन केलेला अपमान सहन करणार का ? असा माझा प्रश्न आहे.

एकनाथ खडसे भाजपचे राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली असून त्यांची नाराजी दूर झाली आहे. शिवसेना नेत्यांना भेटले म्हणजे काही चूक केली नाही, तशी मीही कोणाचीही भेट घेऊ शकतो. शिवसेनेने त्यांच्याकडील नाराज संजय राऊत, प्रताप सरनाईक यांची काळजी करावी. रामदास कदम व अन्य ज्येष्ठाना डावलून नुकतेच निवडून आलेल्या मुलाला मंत्री पद दिले आहे. राज्याच्या राजकारणाची परंपरेची थट्टा सुरू आहे, याचा अगोदर ठाकरे यांनी विचार करावा अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.

कोल्हापूर जिल्हापरिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने पळ काढल्याने आमचा पराभव झाला . त्यामुळे कोल्हापूर मधून भाजप हद्दपार झाली असे नाही. बऱ्याच नगरपालिका आमच्या ताब्यात आहेत. महापालिकेत आमचे नगरसेवक आहेत. आम्हाला पराभूत करण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते याचा अर्थ आम्ही इतर पक्षांपेक्षा ताकतवर आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे
भिडेवाड्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हा वाडा खाजगी मालकीचा असल्याने आणि जागा मालकाने न्यायालयात दावा दाखल केल्याने अडचणी आहेत. परंतु त्यांच्याशी चर्चा करून व अन्य प्रयत्न करून हे स्मारक उभे राहावे यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/