शरद पवारांच्या ‘इव्हेंट’चा काहीही परिणाम होणार नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना उघड झाला आहे. याप्रकरणी एका व्यक्तीने न्यायालयात दाद मगितल्यानंतर या ईडीने याप्रकरणाची सु मोटो चौकशी सुरू केली. बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळावर शरद पवार यांना मानणारे संचालक होते म्हणून ईडी ने पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचा राज्य सरकारशी काहीही संबंध नाही. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे लोक जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आंदोलनाचा इव्हेंट करत आहे. छगन भुजबळ यांना अटक झाली होती ,तेव्हा आंदोलने का झाली नाहीत ? जनता सुजाण आहे, त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या इव्हेंटचा काहीही परिणाम होणार नाही, असे वक्तव्य आज पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या धगफुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी पुणे परिसरात पाहणी केली. यानंतर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, शरद पवार यांच्यावर राज्य सरकारच्या दबावाने कारवाई झाली हा आरोप खोटा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचे उघड केले होते. पवार आणि चव्हाण यांचे राजकीय सख्य सगळ्यांना माहिती आहे. दरम्यान एका व्यक्तीने या घोटाळ्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, घोटाळ्याची व्याप्ती ही 100 कोटी रुपयांच्या पुढे असल्याने ईडीने सु मोटो गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. न्यायालयाच्या आदेशाने याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यामध्ये राज्य सरकारचा संबंध कुठे येतो.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारवर आरोप करणे हे समजू शकतो. परंतु जनतेला सगळे माहिती असते. केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अथवा भाजप कार्यालयाला काळे फासणे हा केवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा इव्हेंट आहेत. परंतु यामुळे काहीही होणार नाही, असेही पाटील म्हणाले.