‘पवारांचा पराभव करणारा अजून जन्माला यायचाय’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाला चुकून लॉटरी लागल्यामुळे त्यांची सत्ता आली आणि चंद्रकांतदादा पाटील मंत्री झाले. पण त्यांनी भुदरगड तालुकयातील त्यांच्या खानापूरची ग्रामपंचायत निवडवूण दाखवावी,आणि मग पवार यांच्या पराभवाची भाषा करावी. पवार यांचा पराभव करणारा अजून जन्माला आलेला नाही. पाटील यांना कोणाबाबत काय बोलायचे याचे भान नाही अशी घणाघाती टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल येथे बोलताना केली. कागल पालिकेच्या वतीने विविध विकासकामांच्या उदघाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले, “शरद पवार यांनी आजपर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाही. शरद पवार माढा आणि सुप्रिया सुळे व अजित पवार बारामतीतून निवडून येतात. त्यांचा पराभव करण्याची ताकद कोणातही नाही. १९८५ मध्ये मला शाहू कारखान्याच्या संचालक मंडळातून काढून टाकले. त्यानंतर मी स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली काम केले. काही निवडणुकीत स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी माझा प्रचार केला. त्यावेळी समरजितसिंह आमच्यासोबत फिरत होते. मग आम्ही खंजीर कसा खुपसला? असा सवाल देखील त्यांनी यावेळी बोलताना केला.

माझी पत्नी जरी राष्ट्रवादी मधून उभी राहिली तरी मी शिवसेनेच्या उमेदवाराचाच प्रचार करणार

माझी पत्नी जरी राष्ट्रवादी मधून उभी राहिली तरी मी शिवसेनेच्या उमेदवाराचाच प्रचार करणार असे चंद्रकांतदादा पाटील भाजप – शिवसेना मेळाव्यात बोलताना म्हणाले होते. भाजप -सेना युतीनंतर कोल्हापुरात आगामी लोकसभेच्या उमेदवारांबाबत चर्चा सुरू आहे. त्यातच शिवसेनेकडून प्रा.संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्यात चुरस रंगणार असे चित्र आहे. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे महाडिकांना साथ देणार अशी चर्चा होती मात्र “समजा माझी पत्नी जरी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तरी मी शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करणार असे वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. ते मुरगूड येथे आयोजित शिवसेना-भाजप मेळाव्यात बोलत होते.