स्त्री शक्ती हीच खरी राष्ट्राची ताकद : चंद्रकांत पाटील

पुणे (कॅम्प) : पोलीसनामा ऑनलाइन  – एक महिला स्वतःच्या घरापासूनच संस्कार आणि प्रगती करीत असते. आज महिला ही प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला पाठीमागे न राहता ती प्रगतीपथावर जात आहे. त्यामुळे स्त्री शक्ती हीच खरी राष्ट्राची ताकद असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महिला दिनानिमित्त आयोजित सुषमा स्वराज प्रेरणा पुरस्कार समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले की, भारतात फार पूर्वीपासूनच स्त्रीचा आदर आणि सन्मान केला जातो. परंतु विविध परकीय आक्रमणाच्या काळात महिला या दुर्लक्षित झाल्या. इतिहासामध्येही महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे .

यावेळी सुषमा स्वराज प्रेरणा पुरस्कार श्री वत्स संस्थेच्या शर्मिला सय्यद, घोरपडी रेल्वे गेटवर एका रिक्षात महिलेची प्रसूती करणार्‍या डॉक्टर विद्या माने, रिक्षा ड्रायव्हर वैशाली रासकर, स्मशानभूमीत सेवा करणार्‍या बेबीताई केदारी, मामलेदार कचेरीतील तलाठी सुवर्णा शिंदे, कॅन्सरग्रस्ताणा मदत करणार्‍या पुष्पा कटारिया यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांड्ये, कार्यक्रमाचे संयोजक आमदार सुनील कांबळे, नगरसेविका अर्चना पाटील, नगरसेविका मनीषा लडकत, प्रियंका श्री गिरी, दिलीप काळोखे, माऊली चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.