CM ठाकरेंना त्यांची ‘भाटगिरी’ करणारे नेते हवेत, चंद्रकांत पाटलांची घणाघाती टीका

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना भाटगिरी करणारे नेते हवे आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हवं ते म्हटलं तर ते चांगलं. त्यांची स्तुती म्हणजेच भाटगिरी करावी, असं दोघांना वाटतं, अशा शब्दात चंद्राकांत पाटील यानी घणाघाती टीका केली. मात्र, त्यांची चूक दाखवली तर पत्रकार देखील जेलमध्ये जातात, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला मराठा आरक्षण टिकवता आले नाही. राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाबाबत इच्छाशक्ती नाही. मुख्यमंत्री घरी बसून राज्य चालवणारे आहेत. सरकारकडून मराठा समाजाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश हे उत्तर असू शकत नाही. अध्यादेश काढला तरी याचिकाकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी सरकारला दिला आहे.

सुशांतसिंह राजूपत प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 45 दिवसांत एफआयआर का दाखल केला नाही, असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.