‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’च्या नादात भाजप होतंय ‘काँग्रेसयुक्त’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा भाजपने मोठा विजय मिळविला आहे. काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लोकसभेत भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तसेच बहुतांश राज्यात भाजपची सत्ता आहे. म्हणजे जवळपास संपूर्ण देशावर भाजपचे राज्य आहे. अशा परिस्थिती देशाच्या विकासाचा विचार करायचा सोडून भाजपच्या नेत्यांकडून काँग्रेसमुक्त देश करण्याची भाषा बोलली जात आहे. नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा नारा देताना पुढील ८ ते १० दिवसांत काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील होणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे पाटील यांना काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायचा आहे की, काँग्रेसयुक्त भाजप असा सवाल उपस्थित होत आहे. देशात आज घडीला काँग्रेस बॅकफूटवर गेलेले आहे. मात्र बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्ताधारी पक्षात चांगलीच मागणी असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. यामुळे भाजपची आगामी काळातील रणनिती काँग्रेसयुक्त भाजप अशीच होईल, अशी टीका भाजपवर करण्यात येत आहे.

देशातील १८ राज्यांत भाजप सत्तेत आहे. लोकसभेच्या ३०३ जागा भाजपने जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे मित्रपक्ष असो वा नसो भाजपला फरक पडणार नाही. अशा स्थितीत देश चालवणे सोपे होणार आहे. भाजपला येणाऱ्या काळात राज्यसभेतही बहुमत मिळणार असं दिसत आहे. त्यामुळे भाजपने समृद्ध देश, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र अशी घोषणा देणे अपेक्षीत होते. परंतु, तसं होताना दिसत नाही.

 

Loading...
You might also like