आघाडी विरोधात अवमान याचिका दाखल करणार, चंद्रकांत पाटलांचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सुरु आहे. असे असले तरी ही चौकशी भाजपकडून यंत्रणेचा दुरुपयोग करुन करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे भाजप त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना दिला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून गरज असेल तर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला दिले आहे. न्यायालयाचे निकालपत्र वाचले तरी हे स्पष्ट होते. त्यामुळे केवळ चौकशीचा आदेश दिला होता तरीही गुन्हा नोंदवून छापे मारले ही आघाडीच्या नेत्यांची तक्रर निरर्थक असल्याचे पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीमधील शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिनही पक्षातील नेत्यांच्या भूमिका या सोईच्या असतात. त्यांना अनुकूल निकाल न्यायालयाने दिला तर न्यायालय चांगले आणि प्रतिकूल आदेश दिला तर शंका उपस्थित करतात. ईव्हीएम मशिनबाबतची त्यांची भूमिका देखील निवडणुकीत विजय मिळाला अथवा पराभव झाला यानुसार बदलते. अशी हम करे सो कायदा, ही त्यांची भूमिका लोकशाहीत चालणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

विश्वासघातामुळे आम्ही विरोधात

शिवसेनेवर निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपला जनतेने विधानसभेमध्ये जनादेश दिला होता. विश्वासघात झाल्यामुळे भाजप सत्ताधारी होण्याऐवजी विरोधी पक्ष झाला. मात्र, विरोधी पक्ष म्हणून देखील भाजप आपली भूमिका गंभीरपणे सातत्याने मांडत आहे. तसेच आक्रमकपणे पार पाडत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी विरोधी पक्षाची असते आणि ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडत आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.