काय सांगता ! होय, फडणवीसांच्या निर्धाराबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांची खुर्ची ‘मोडली’, पुढं झालं ‘असं’ काही

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – देशात आणि राज्यात वर्षा-दीड वर्षापासून बहुतांश भागात भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर जणू खुर्ची रुसूनच बसलीय. जरी केंद्रात भाजपने बाजी मारली असेल परंतु देशातील विविध राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागत आहे. कालच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाला. एकूणच काय तर सध्या सत्ता आणि खुर्ची भाजपावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. याचाच प्रत्यय आज सोलापूरमध्ये आला.

आज चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते. ते सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधत असता ते देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या निर्धाराबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देत होते. तेव्हा अचानकच चंद्रकांत पाटील ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची तुटली आणि चंद्रकांत दादांचा तोल जाता जाता राहिला. त्यांनी स्वत:ला वेळीच सावरल्याने ते पडता पडता वाचले. हा प्रकार झाल्यानंतर या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना दिसत आहे.

या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले की, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीचा विजय झाला. मात्र या विजयाचा आनंद शरद पवार आणि उद्धव ठाकरे व्यक्त करीत आहेत. तसेच त्यांनी टोमणा मारला की शेजारच्या घरात मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटण्याचा हा प्रकार आहे. शिवसेनेने सामनातून आमच्यावर टीका करण्याऐवजी राज्यात एकट्याने निवडणूक लढवून दाखवावी असे देखील ते शिवसेनेला लक्ष करत म्हणाले. तसेच ते म्हणाले की राज्यातील सरकारमध्ये अजिबात ताळमेळ नाही आणि त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होत आहे. राज्यामध्ये महिलांवर रोज कुठे ना कुठे अत्याचार होत आहे, अशी टीका देखील त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर केली.