चंद्रकांतदादांचे गणित कच्चे, भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी; शिवसेना नेते सत्तार यांचे टीकास्त्र

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन –  नुकत्याच झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा हा शेवटून एक नंबर आहे. चंद्रकांतदादांचे गणित कच्चे असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आहे. भाजपा खोटी आकडेवारी देणारी पार्टी झाली असून ती जनतेची दिशाभूल करत आहे. तसेच, महाराष्ट्रात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनाच एक नंबर आहे. याशिवाय, आमच्याकडे परिपूर्ण आकडेवारी असून आकडेवारीच्या मुद्द्यावरून भाजपाच्या नेत्यांना समोरासमोर येण्याचे आव्हान राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

धुळ्यात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाखा फलकाच्या उद्घाटन प्रसंगी सत्तार बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजपाला सर्वात जास्त जागा मिळाल्याचा दावा सत्तार यांनी फेटाळून लावला आहे. यावेळी धुळे जिल्ह्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान राज्यात 34 जिल्ह्यांमध्ये जवळपास 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर होत नसल्यामुळे कोणत्या पक्षाला किती ग्रामपंचायती मिळाल्या हे सांगणे कठीण आहे. मात्र, निकाल हाती आल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपणच सर्वात चांगली कामगिरी केल्याचा दावा केला होता. तसेच, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपाने 6 हजार जागा जिंकल्याचा दावा केला होता. तर काँग्रेसनेही 4 हजार जागा जिंकल्याचे म्हटले होते.