पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrakant Pulkundwar | भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीमला प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी, युवा उद्योजकांच्या नवसंकल्पनांना वाव देणे, स्टार्टअप व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे, देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये युवा उद्योजकांचा सहभाग वाढावा आणि जागतिकीकरणाचा सुसंगत विकास साधण्यासाठी युवकांसाठी व्यासपीठ निर्माणासाठी युवकांच्या सहभागाने १६ जानेवारी रोजी पुण्यात आयोजित पदयात्रा सर्व संबंधित विभागांनी आपापसात ताळमेळ ठेवून उत्कृष्ट नियोजनाद्वारे यशस्वी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा विभागाने राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त पुणे येथे युवकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागाने आयोजित नियोजित पदयात्रेच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार बोलत होते. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर आयुक्त सामान्य प्रशासन समीक्षा चंद्राकार, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त गुरुवार, १६ जानेवारी,२०२५ रोजी सकाळी आठ ते दहा या कालावधीत सर परशुराम भाऊ महाविद्यालय ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर पदयात्रेचचे आयोजन करण्यात आले असून त्यामुळे पुण्याचा सन्मान वाढला आहे. केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम कार्यक्रम संपन्न होणार आहे.
स्टार्टअप व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे, युवा उद्योजकांच्या नवसंकल्पनांना वाव देणे, देशाच्या व राज्याच्या जडणघडणीमध्ये युवा उद्योजकांचे योगदान वाढावे यासाठी प्रयत्न करणे यासाठी १६ जानेवारी रोजी स्टार्टअप दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये शाळा महाविद्यालये विविध शैक्षणिक संस्था यांचे सुमारे वीस हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. महानगरपालिका, पोलीस विभाग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, उद्योजक व बँका यांच्या सहभागाने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विभागांनी त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी स्वयंप्रेरणेने चोखपणे पार पाडावी आणि पदयात्रा कार्यक्रम यशस्वी करावा. बैठकीत पदयात्रा मार्ग, सुरक्षा, वाहतूक, पदयात्रेत विविध विभागांना सामावून घेणे, पदयात्रा मार्गावर स्टार्टअपचे स्टॉल उभारणे, अल्पोपहार व पाणी पुरवठा याचा आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला.
केंद्रीय क्रीडा व युवक राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून स्टार्टअपचे महत्त्वाचे केंद्र आहे. पदयात्रेत सहभागासाठी प्रशासनाने युवकांना आणि स्टार्टअप उद्योजकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला विविध विभागांचे व बँकांचे वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.