Post_Banner_Top

तरुणाला बेदम मारहाण करणारा सहायक पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – तपासासाठी तरुणाच्या घरी गेल्यानंतर नशेत असलेल्या तरुणाला बेदम मारहाण करून चक्क त्याच्या डोक्यावरील केस कातडीसह कापणाऱ्या पिट्टीगुड्डा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

जिवती तालुक्यातील आंबेझरी गावातील देविदास कंदलवार हा तरुण दारूच्या नशेत गावकऱ्यांना त्रास देतो. अशी तक्रार होती. त्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करता सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे यांनी तीन शिपायांसह थेट त्याचे घर गाठले. ते त्याच्या घरी आले तेव्हा तो नशेत होता. त्यानंतर त्याला अमानुष मारहाण करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता अनिल आळंदे यांनी खिशातून चाकू काढला आणि देविदासच्या डोक्यावरील केसांसोबत त्याची कातडीही कापून फेकली. त्यानंतर तो रक्तबंबाळ झाल्याचे पाहून त्याच्या पत्नीने त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी तिलाही मारहाण केली. गावकऱ्यांनाही पोलिसांनी हाकलून लावलं. त्यानंतर देविदासचा रक्तस्त्राव वाढत असल्याने त्याला रात्री उशीरा गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.

हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. परंतु स्थानिकांनी हे प्रकरण उघडकिस आणले. विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकऱणाचा तपास केला. तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे हे दोषी आढळले. त्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून  अनिल आळंदे यांना निलंबित कऱण्यात आले आहे.

Loading...
You might also like