पैशाच्या जोरावर दोन आमदारांनी आपल्याच पक्षाला धरलं वेठीला

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत राज्यातील चंद्रपूरच्या राजकारणात मोठ्याप्रमाणात हालचाली सुरु आहेत. चंद्रपूरच्या तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. रविवारी जाहीर झालेल्या काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत चंद्रपूरचे तिकीट शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांना देण्यात आलं आहे. यापूर्वी या जागेवर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांचे नाव घोषित केले होते. मात्र, ते आता धानोरकरांना दिल्याने बांगडे नाराज झाले आहेत. त्यामुळे बांगडे यांनी आपल्याच पक्षातल्या दोन आमदारांवर गंभीर आरोप करत पैशाच्या बळावर या दोन आमदारांनी पक्षालाच वेठीला धरलं असा आरोप त्यांनी केला.

कांग्रेस पक्षातल्या दोन आमदारांनी पैशाचे राजकारण करत पक्षालाच वेठीस धरले आहे. मुद्दाम ऑडीयो क्लिप चालवून व्हायरल करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना चाळीस वर्षापासून पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याऐवजी शिवसेनेतले बाळू धानोरकर जवळचे झाले आहेत. कांग्रेसचे काही धंदेवाईक आमदार पक्षाला वेठीस धरण्याचे काम करत आहेत, असं बांगडे यांनी म्हटलं.

तसंच, विदर्भातल्या कांग्रेस पक्षाला वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या नेत्यांनी दबावाचं राजकारण सुरू केल आहे. त्याचा समाचार पक्ष श्रेष्ठींनी घेतला पाहिजे. पक्षातल्या नेत्यांना कांग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याबद्दल जिव्हाळा नाही. ज्यांनी अजुन कांग्रेसमध्येही प्रवेश केला नाही त्यांच्याबद्दल एवढा जिव्हाळा का? असा सवालही त्यांनी केला.

दरमयान, चंद्रपूरात उमेदवारी अर्ज भरण्याला एक दिवस राहिलेला असताना काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातला उमेदवार दुसऱ्यांदा बदलला आहे. आज जाहीर झालेल्या नव्या यादीत शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांना अखेर काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.