चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Chandrapur Crime News | गडचांदूर शहरात गुरुवार (दि.१०) प्रज्वल नवले याचा मृतदेह सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या मागे आढळून आला व त्याचा मित्र नागेश लांडगे हा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याला शहरामध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याला विषबाधा झाली या निष्पन्नतेच्या आधारे डॉक्टरांनी उपचार केले.
परंतु तीन दिवसांनी शनिवारी (दि.१२) त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोघांच्या रहस्यमय मृत्यूने गूढ अजूनही कायम आहे. हे दोघे कसं काय विष किंवा विषयुक्त पेय घेऊ शकतात यावर कुटुंबीयांना शंका आहे. दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी हे प्रकरण प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याची चर्चा आहे.
अधिक माहितीनुसार, प्रज्वल हा माणिकगड रोडवरील भारत गॅरेजमध्ये काम करायचा. त्याचे आई वडील विभक्त राहत असून प्रज्वल आईकडे राहायचा. बुधवारी (दि.९) दुपारी ३.३० वाजता नागेश लांडगे सायकलवरून मृतक प्रज्वलला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला. त्यावेळी नागेशच्या वागण्यावरून तो एका मुलीचा संदेश घेऊन आल्याचे आईला लक्षात आले. त्यामुळे नागेशचा मोबाईत ताब्यात घेतला. प्रज्वलच्या आईने मोबाईल घेतल्याने आपले बिंग फुटणार अशी भावना नागेशच्या मनात आली.
प्रज्वलने आईला नागेशचा मोबाईल परत करण्यात सांगितले मात्र तुझा मोबाईल दे असं आई म्हणाली. नागेशचा मोबाईल परत करण्याच्या बदल्या प्रज्वलने स्वतःचा मोबाईल आईला दिला. त्यानंतर दोघे ४.३० वाजता सायकलने घराबाहेर पडले. प्रज्वलच्या आईने नागेश आणि प्रज्वलचा पाठलाग केला मात्र ते थांबले नाहीत. रात्री १० वाजेपर्यंत आईने शोध घेतला. जवळपास १०० हून अधिक वेळा तिने नागेशच्या मोबाईलवर फोन केले मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
गुरुवारी (दि.१०) सकाळी ८.३० वाजता प्रज्वल मृतावस्थेत आढळल्याची माहिती समजताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले. त्यावेळी नागेश बेशुद्ध अवस्थेत आढळला. आता उपचारावेळी नागेशच्या मृत्यूमुळे या दोघांच्या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.