चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि CEO ला अटक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 24 कर्मचार्‍यांच्या पाल्यांना नियमबाह्य पध्दतीने अनुकंप तत्वावर नोकरीत सामावून घेतल्याप्रकरणी अध्यक्ष मनोहर पाऊणकर व सीईओ सिध्दार्थ नामदेव दुबे यांना अटक करण्यात आली आहे.

फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार होते. काल आर्थिक गुन्हे शाखेत शरणागती पत्करल्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याने, सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 24 कर्मचार्‍यांना शारीरिकदृष्ट्या काम करण्यास असमर्थ असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र जोडून 24 पाल्यांना अनुकंप तत्वावर बँकेच्या सेवेत सामावून घेतले. या प्रकरणाची तक्रार बँकेचे संचालक संदिप गड्डमवार, संतोष रावत व माजी अध्यक्ष शेखर धोटे यांनी केली होती.

राजकीय आशिर्वादामुळे तक्रारीनंतरही पाऊणकर यांच्याविरूध्द बरेच दिवस गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान संचालक संदिप गड्डमवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल करताच अध्यक्ष व सीईओ विरूध्द गुन्हा दाखल झाला. दोघांनीही जामिनासाठी जिल्हा न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही न्यायालयाने जामिन फेटाळल्यानंतरही अध्यक्ष व सीईओ फरार होते. दरम्यान बँकेच अध्यक्ष पाऊणकर यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.