चंद्रपूरात गळा आवळून पत्नीचा केला खून, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्यतेचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूरमध्ये उघडकीस आली. सरला सुभाषा धोटे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वरोड्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या माढेळी मार्गावरील वंधली येथे सुभाष धोटे दोन मुले व पत्नी सरलासह वास्तव्यास आहे. त्यांची दोन्ही मुले बाहेरगावी असतात. पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे राग अनावर झाल्याने सुभाषने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच पोलिस पाटलांनी वरोडा पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पती-पत्नीला वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सरला हिला मृत घोषित केले, तर सुभाषची प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता प्रथमदर्शनी सरलाचा गळा दाबून खून केल्याचे निदर्शनास आल्याचे डॉ. सिद्धार्थ गेडाम यांनी सांगितले.