चंद्रपूर : दुर्दैवी ! वरात घेऊन निघताच नवरदेवाचा मृत्यू, दोन्ही कुटुंबांवर शोककळा

चंद्रपूर: पोलीसनामा ऑनलाइन – विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. त्यानंतर नववधूला स्वगावी घेऊन जाण्यासाठी नवरदेव मोटारीत बसला. मात्र नवरदेवाची प्रकृती अचानक बिघडली अन् काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. आवळगावात (जि. चंद्रपूर) गुरुवारी (दि.15) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या वधूच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नाजूक अभिमन्यू पोहनकर असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वासेरा (ता. सिंदेवाही) येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपालीशी गुरुवारी ठरला होता. कोरोनामुळे नियमांचे पालन करत नवरदेवाने मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला वधूच्या घरी आला होता.

सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास आनंदाच्या वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाह पार पडला. दुपारी 3 च्या सुमारास रितीरिवाजानुसार नवरदेव वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. अशातच अचानक नवरदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. ब्रह्मपुरी वरून आरमोरीला नेत असताना वाटेतच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.