महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकाला चोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. चेतन दाते असे या व्यवस्थापकाचे नाव असून तो कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याविषयी अश्लील शब्दाचा वापर करायचा. दाते याला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

दाते हा महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात व्यवस्थापकाचे काम करतो. तो कार्यालयातील एका महिलेला वारंवार कामावरून काढून टाकण्याची धमकी देत होता. तसेच त्या महिला कर्मचाऱ्याशी चेतन अश्लील भाषेत बोलायचा.गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरु होता. शेवटी वैतागून पीडित महिलेने याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर मनसेच्या महिला शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांच्यासह कार्यकर्त्यांनी महिंद्रा होम फायनान्सच्या कार्यालयात जाऊन व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला.

त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात देखील नेण्यात आले. मात्र त्यावेळी चेतन दाते याने पीडित महिलेची माफी मागितली. त्यानंतर त्याला सोडण्यात आले. पण दाते याला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ मात्र सोशल नेट्वर्किंग साईटस वर व्हायरल होतो आहे.