दुर्दैवी ! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियासह दर्शनासाठी गेलेल्या मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियासह दशर्नासाठी गेलेल्या दहावीत शिकणा-या एकुलत्या एक मुलाचा नदीपात्रातील पाण्यात बूडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि. 11) गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहित जनार्धन देठे (वय 16) असे बुडून मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त नदीपात्रात आंघोळ करण्यासाठी गोंडपिपरी येथील दहा महिला व दोन मूल ऑटोने येनबोथला येथील वैनगंगा नदीवरील मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन त्यांनी आंघोळ केली. त्यानंतर सर्व महिला मंदिर परिसरात बोलत बसल्या होत्या. त्यावेळी रोहित व शिवम माकोडे (वय 11) हे नदीपात्राच्या पारीवर फिरत होते. त्यावेळी अचानक रोहितचा पाय घसरला अन् तो नदीपात्रात बुडाला. तो बाहेर येत नसल्याचे पाहून शिवमने नदीपात्रात उडी घेतली. पण पात्र खोल असल्याने तो बुडू लागला. त्यावेळी त्याने मदतीसाठी हाक दिली. एवढ्यात येनबोथला येथील चौघांनी नदीपात्रात उडी घेत शिवम व रोहितला बाहेर काढले. त्यावेळी रोहीत हा बेशुध्द होता. कुटुंबातील महिलांना घटनेची माहिती कळताच त्यांनी हंबरडा फोडला. रोहितला गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात केले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रोहित येथील सान्जो कॉन्व्हेंटमध्ये दहावीत शिकत होता. येथील इलेक्ट्रिकल दूकानदार जनार्धन देठे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अतिशय शांत स्वभावाच्या विद्यार्थ्यांच्या दुदैवी मृत्यूने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.